‘काँग्रेस सोबत १२ वर्षे सहवासात राहून माझा सर्वनाश झाला असून माझ्या ‘गुड विल’ मुळे माझा सत्यानाश होण्यापासून वाचला’ या एच. डी. कुमारस्वामी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींच्या या वक्तव्याची खिल्ली उडविली असून ‘गुड विल असेल तर सर्वनाश होईल, जर गुडविल नसेलच तर कुठून सर्वनाश होणार?’ अशी टीका करत कुमारस्वामींच्या वक्तव्याची खिल्ली उडविली आहे.
बेळगावमधील सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. कुमारस्वामी हे खोटे बोलण्यात सराईत आहेत. त्यांच्या बोलण्यात कसलेही तथ्य नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद देणे हि आमची चूक होती.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी होती, त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले होते. काँग्रेसच्या जागा जास्त असत्या तर यांना कोण मुख्यमंत्रीपद दिले असते? आम्ही मुख्यमंत्रीपदाचा मान दिला, त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला आहे. त्यांना मुख्यमंत्रीपद देणे हि आमची चूक ठरली का? असा प्रश्न सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.
कुमारस्वामी नेहमीच डोळ्यात अश्रू आणतात, हि त्यांची संस्कृती आहे. त्यांच्याकडे हि संस्कृती देवेगौडा यांच्याकडून आली आहे. चांगल्या असो किंवा वाईट कोणत्याही गोष्टीसाठी ते नेहमीच अश्रू ढाळतात, या अश्रूंची काहीही किंमत नाही, अशा शब्दात कुमारस्वामी यांना सिद्धरामय्या यांनी टोला लगावला आहे.