एकतर्फी प्रेमातून एका व्यक्तीने तलवारीचे सपासप वार करून बीम्स हॉस्पिटलमध्ये सेक्युरिटी गार्डचे काम करणाऱ्या एका युवतीचा निर्घृण खून केल्याची घटना आज बुधवारी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे हॉस्पिटल आवारात एकच खळबळ उडाली.
सुधाराणी हडपद (वय 27) असे खून झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नांव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बैलहोंगल येथील एकजण सुधाराणी हिच्यावर प्रेम करत होता.
तथापि या प्रेमाला सुधाराणीकडून नकार होता आणि ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या त्या व्यक्तीने आज सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास बीम्स हॉस्पिटल आवारामध्ये सुधाराणी हिच्यावर तलवारीने हल्ला करून तिच्यावर तलवारीचे प्राणघातक वार केले. परिणामी सुधाराणी रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून जागीच गतप्राण झाली.
या घटनेमुळे बीम्स हॉस्पिटल आवारात एकच खळबळ उडाली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे सीपीआय जावेद मुशाफिरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
त्याचप्रमाणे पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोराला तलवारीसह जेरबंद करण्यात आले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.