शाळा महाविद्यालय 1 जानेवारीपासून सुरू करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असून त्यानुसार संपूर्ण खबरदारी घेऊन 1 जानेवारी 2021 पासून इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वर्ग नियमितपणे आणि 6 वी ते 9 वीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यागम कार्यक्रमांतर्गत शिक्षण देण्यास प्रारंभ होणार आहे.
नववर्षात जनजागृती करून योग्य खबरदारी घेण्याद्वारे शाळा सुरू केल्या जातील. यासाठी थर्मल स्क्रीनिंग आणि जंतूनाशक फवारणीची जबाबदारी ग्रामपंचायत, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षण खात्याने विद्यागम वर्ग भरविण्याबाबत गेल्या 23 डिसेंबर रोजी सुधारित मार्गदर्शक सूची सर्व शाळांना पाठवली आहे. वर्ग भरताना सुरक्षित अंतर, मास्क आणि सॅनीटायझर यांचा वापर करावा लागणार आहे. चंदन टीव्हीवर सुरू असलेला अभ्यासक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.
शाळा दोन सत्रात सुरू होणार असून 45 मिनिटांचा एक तास असेल. दररोज सकाळी 10 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 2 ते 4:30 या वेळेत शाळा सुरु ठेवण्यात येतील. यासंदर्भातील मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे आहे. 1) विद्यार्थ्यांचे रोज थर्मल स्क्रीनिंग, 2) ताप सर्दी खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांना घरीच राहावे लागेल, 3) विद्यार्थ्यांच्या हजेरीनुसार शिक्षकांचे वर्गीकरण करावे लागेल, 4) ऑनलाइन वर्ग यापुढे देखील सुरु ठेवावेत, 5) सरकारी अनुदानित, विनाअनुदानित शाळांनी शाळेच्या आवारात वर्गाची आसन व्यवस्था करावी, 6) ऑनलाइन शिक्षण शक्य नसणाऱ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे,
7) पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे संमतीपत्र आवश्यक, 8) शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी परगांवी असतील तर जवळपासच्या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल, 9) ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तालुका पंचायत, तालुक्यात नगर परिषद आणि शहरात महानगरपालिकेकडून जंतूनाशक फवारणी करून घ्यावी, 10) विद्यार्थ्यांनी पिण्याचे पाणी स्वतः बाटलीतून आणावे.
11) शाळेत फिल्टरचे पाणी मिळण्याची सोय करावी, 12) वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांना कोव्हीड चांचणी सक्तीची असेल, 13) 50 वर्षे उलटलेल्या शिक्षकांनी मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे, 14) सुधारित अभ्यासक्रम 6 जानेवारी रोजी जाहीर केला जाईल. त्याप्रमाणे शिकविणे, 15) शाळेत माध्यान्ह आहार मिळणार नाही त्याऐवजी अन्नधान्य वितरित केले जाईल, 16) विद्यार्थी शिक्षकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांनी आरोग्य खात्याच्या निरीक्षणाखाली विलगीकरण कक्षात राहून उपचार घ्यावेत, 17) कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्व शाळांनी खबरदारी घ्यावी.
शाळेचे वेळापत्रक असे असेल : पहिला टप्पा (सकाळी 10 ते दुपारी 12:30) – सकाळी पहिला तास 10 ते 10:45, दुसरा तास 10:45 ते 11:30, मधली सुट्टी 11:30 ते 11:45, तिसरा तास 11:45 ते 12:30 आणि चौथा तास 12:30 ते 01:15. दुपारी पहिला तास 2 ते 02:45, दुसरा तास 02:45 ते 03:30, विश्रांती 03:30 ते 03:45, चौथा तास 03:45 ते 04:30.