गो-हत्या निःशेष कायदा अंमलात आणून गोरक्षणाचा कांगावा करणाऱ्या भाजपच्या राज्यात सर्वाधिक गो-मांस विदेशात निर्यात करण्यात येते, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भाजपवर केली आहे.
गोकाक मधील हिल गार्डन येथे काँग्रेसच्या १३६ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या सभेत ते बोलत होते. गोहत्या विधेयक अंमलात आणले यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभर भाजपकडून कांगावा करण्यात येत आहे. याआधी काँग्रेसने सर्वप्रथम हा कायदा अंमलात आणला होता. परंतु या विधेयकात काही त्रुटी होत्या. त्यानंतर या विधेयकात सुधारणा करण्यात आली. परंतु १३ वर्षांच्या म्हशींची कत्तल करण्याची परवानगी या विधेयकात देण्यात आली आहे. गोहत्या बंदी करायचीच असेल तर संपूर्णपणे करायची गरज होती, असेही जारकीहोळी म्हणाले. भाजपच्यावतीने नेहरूंवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी नेहरूंना दोषी ठरविण्यात येत आहे. देश आज ज्या प्रगतीपथावर आहे यात नेहरूंचा मोठा वाट आहे. त्यांच्या दूरदृष्टिकोनामुळे देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जल प्रकल्प, डॅम निर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी, विमानतळ ही सर्व विकासकामे नेहरूंमुळे शक्य झाली असल्याचेही त्यांनी म्हटले.
भाजपने एकतरी डॅम बांधला आहे का? देशाच्या विकासापेक्षा सर्जिकल स्ट्राईक, गोहत्या निषेध, लव्ह जिहाद केवळ याच गोष्टींसाठी भाजप कार्यरत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशभक्ती ही प्रत्येकाच्या जन्मापासून भिनलेली असते. त्यासाठी देशभक्तीच्या नावाखाली जनतेची दिशा भरकटवण्याचे कोणतेही कारण नाही. खोट्या गोष्टी सांगून, इतिहासातील गोष्टी जनतेला सांगून दिशा भरकटवणे हा भाजपचा नेहमीचा कार्यक्रम असल्याचीही टीका सतीश जारकीहोळी यांनी केली.
या कार्यक्रमाला राहुल जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी, प्रकाश डांगे, विवेक जत्ती, इमरास तपकीर, शंकर गिड्डन्नवर, बसंगौड होळयाचे, मंजुळा रामगनट्टी आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.