निव्वळ निवडणुकीपुरता मराठी मतांचा जोगवा मागण्यासाठी मराठी भाषिकांच्या बाजूने बोलणाऱ्या ग्रामीण आमदार या नक्की कोणाच्या बाजूने आहेत? याचा सुगावा लागणे कठीण आहे. कारण ज्या ज्या वेळी आपला स्वार्थ साधण्याची वेळ येते त्या त्या वेळी कधी कन्नड संघटनांच्या बाजूने तर कधी मराठी जनतेच्या बाजूने बोलणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या नेमक्या कोणासाठी कार्य करतात? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
सोमवारी सकाळी मूठभर कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मराठी जनतेच्या अस्मितेचा केंद्रबिंदू असणाऱ्या महानगरपालिकेवर लाल – पिवळा ध्वज अनधिकृतरित्या फडकविला. यावेळी पोलीस उपस्थित असूनही बघ्याची भूमिका घेण्याव्यतिरिक्त कोणतेही पाऊल पोलिसांनी उचलले नाही. शिवाय मराठी जनतेला या ना त्या कारणाने कायद्याचे धडे आणि ज्ञान शिकविणाऱ्या पोलिसांनी इथे मात्र ‘अळी, मिळी गुप चिळीचे’ तंत्र अवलंबिले. या घटनेनंतर समस्त सीमाभागातील मराठी जनतेमध्ये संताप उफाळून आला.
दरम्यान या घटनेवर प्रसारमाध्यमांनी ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी माध्यमानी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता, “कर्नाटकात कन्नड ध्वज फडकू नये का”? अशी प्रतिक्रिया हेब्बाळकरांनी व्यक्त केली. या प्रतिक्रियेनंतर पुन्हा एकदा ग्रामीण आमदारांना मराठी जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
मराठी मतांशिवाय निवडणुकीत विजयी होणे अशक्य आहे. याची जाणीव ग्रामीण आमदारांना चांगलीच आहे. यासाठीच निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषिक जनतेकडे गोडीगुलाबीने, मराठीच्या बाजूने भाषणे देत, मराठी जनतेचे सांत्वन करत आणि अशी अनेक निवडणूक नाटके करून जोगवा मागणाऱ्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकरांचे हेच खरे स्वरूप आहे का? असा सवाल मराठी जनता उपस्थित करत आहे. महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज हा कन्नड आणि कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणारा आहे, असा समज जरी असला तरी या ध्वजाला कायदेशीर, अधिकृतरीत्या परवानगी नाही. तरीही महापालिकेसमोर इतका धुमाकूळ घालून मर्कटलीला करत एका प्रशासकीय इमारतीसमोर गोंधळ घालून बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांची बाजू उचलून धरणाऱ्या आमदार हेब्बाळकर यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर येऊ लागला आहे अश्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
सीमाभागातील समस्त मराठी जनतेने आतातरी राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांचे खरे स्वरूप ओळखून मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नासाठी आगामी निवडणुकीत मतदाराची शक्ती आणि मराठी जनतेची खरी ओळख आणि सीमाभागावरील वर्चस्व सिद्ध करणे गरजेचे आहे.
बेळगाव महा पालिके समोर कन्नड ध्वज फडकावल्या पाश्वभूमीवर ग्रामीण आमदारांची प्रतिक्रिया-“कर्नाटकात कन्नड ध्वज फडकू नये का”? पहा बेळगाव Live वर