कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कोविड तज्ञ् समितीने वर्तविली असून खबरदारीसाठी यंदाच्या नववर्षाच्या स्वागतासाठी महसूल विभागाने निर्बंध लादले आहेत. सार्वजनिक ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टी करण्यावर महसूल विभागाने बंदी घातली असून यासंदर्भातील अधिकृत आदेश लवकरच जाहीर होईल, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आर. अशोक म्हणाले, गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून संमती मिळविली आहे. बंगळूरमध्ये पुन्हा एकदा चर्चा करून यासंदर्भात
अंतिम निर्णय घेण्यात येईल. बार. रेस्टोरंटस हे खुले असू शकतील. परंतु कोविड संदर्भातील आवश्यक ती सर्व खबरदारी आणि नियमावलीला अनुसरून याठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाऊ शकते. परंतु सार्वजनिक ठिकाणी पार्टी करण्यास मात्र बंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
कुमारस्वामी यांनी केलेल्या वक्तव्यावरही आर. अशोक यांनी प्रतिक्रिया दिली असून, ते याबाबत म्हणाले, कि कुमारस्वामींना आता याचा उलगडा होऊ लागला आहे. काँग्रेससोबत राहून वनवास भोगावा लागला हे आत्ता त्यांच्या लक्षात आले आहे.
कुमारस्वामी भाजपशी हातमिळवणी करायच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले कि, भाजपमध्ये आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. आणि सध्या भाजपाला कोणासोबतही ऍडजस्टमेन्ट करण्याची गरज नाही. भाजपमध्ये पुष्कळ लोक आहेत. त्यामुळे कुमारस्वामींसारख्या नेत्यांची भाजप गरज नसल्याचे मत आर. अशोक यांनी व्यक्त केले.
भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत बेळगाव विभाजनावर तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले असून, नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमासंबंधी बंगळूरमध्ये मुख्यमंत्र्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.