रयत गल्ली, वडगांव येथील पाणीपुरवठा गेल्या चार दिवसापासून अचानक बंद झाल्यामुळे मोठी गैरसोय निर्माण झाली असून पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गल्लीतील त्रस्त महिल व शेतकऱ्यांनी दिला आहे.
गेल्या पंधरवड्यापूर्वी रयत गल्ली वडगांव येथील सार्वजनीक विहिरीतून जनतेला पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अचानक चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. या गल्लीत बहुतांश शेतकरी असून जवळपास 100 जनावरं आहे. या जनावरांना तसेच इतर कामासाठी पाणी लागते. सध्या पाणीपुरवठा बंद झाल्याने मोठी अडचण आणि गैरसोय निर्माण झाली आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा व्यवस्थापन मंडळाला कळवून देखील त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.
दरम्यान, गल्लीतील युवकांनी बंद पडलेली मोटर विहिरीतून काढून ठेकेदाराकडे सोपवली. ती रिपेरी होईस्तोवर भेडसावणारी पाण्याची कमी करण्यासाठी लहान मोटर विहिरीत सोडण्यात आली आहे. तथापि या मोटारीची पाणी घेण्याची क्षमता कमी असल्यामुळे संपूर्ण गल्लीला तुटपुंजा पाणीपुरवठा होत आहे.
आता शेतात मळण्यांच्या हंगाम असल्याने पाणी भरण्यात वेळ घालवायचा कि शेतात जायच हेच कळेनास झाले आहे. परिणामी गल्लीतील विशेष करून महिलावर्ग अतिशय संत्रस्त झाला आहे. त्यामुळे आता पाणी पुरवठा मंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन तिथे धरणे धरुन विहिरीतील मोटर बदलून नवीन मोटार बसवावी तसेच बाजूला बसवलेली विद्यूत पेटीही जूनी काढूण नवीन बसविण्याच्या मागणीसाठी रयत गल्लीतील महिलांसह शेतकरी, युवक आणि युवती आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब नवीन मोटर, त्याला विद्यूत पुरवठा करणारी नवीन पेटी बसवावी अन्यथा शेतकरी महिला,शेतकरी व इतर जनता पाणी पुरवठा मुख्य कार्यालयावर धडक मारल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.