कोरोनामुळे 2020 हे वर्ष अत्यंत संस्मरणीय ठरले असून आज रात्री या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील हौशी मंडळींसह तरुणाई सज्ज झाली आहे. तथापि यंदाच्या जल्लोषावर शासकीय नियमांची मर्यादा असणार असल्यामुळे सरत्या वर्षाला साधेपणाने निरोप दिला जाणार आहे.
आजचा 31 डिसेंबरचा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवार असल्यामुळे आज मांसाहार वर्ज्य आहे. यापद्धतीने यंदा थर्टी फर्स्ट मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आल्यामुळे खवय्यांची गोची झाली आहे. मार्गशीर्षातील गुरूवारी घरात मांसाहार वर्ज्य असल्यामुळे तरुणाईने घराबाहेर मेजवानीचे नियोजन केले आहे. ग्रा. पं. निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या पार्ट्या थर्टीफर्स्टचा मुहूर्त साधून रंगण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदा कोठेही गर्दी होणार नाही याकडे प्रशासनाचे लक्ष असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक घडामोडींवर पोलिस खात्याची देखील करडी नजर राहणार आहे. तरीही थर्टी फर्स्टसाठी शहर परिसरातील हॉटेल्स आणि धाबे सज्ज झाले आहेत.
हॉटेल आणि धाब्यांवर पार्टीसाठी मोठी गर्दी होणार असल्याने हॉटेल चालकांनीही नियोजन पूर्ण केले आहे. शहर आणि ग्रामीण भागातील युवा पिढीमध्ये पर्यटन स्थळी जाऊन थर्टी फर्स्ट साजरा करण्याची क्रेझ आहे. त्यामुळे अनेक जण नजीकच्या पर्यटन स्थळावर पार्टी करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आज थर्टीफर्स्टच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1295273987496858/