बेळगावमधील पालकमंत्र्यांसहीत भाजपच्या मंत्र्यांनी आपल्या विभागात परिणामकारक कार्य केले आहे. भाजपच्या प्रत्येक मंत्र्यांनी आपापली कामे योग्यरितीने केल्यामुळे भाजप हायकमांड या मंत्र्यांवर खुश आहे. परंतु काँग्रेसच्या आमदारांनी कोटी लक्ष्मणरेषा पाळली आहे? यावर आपल्याला आश्चर्य वाटत आहे, असा टोला रमेश जारकीहोळी यांनी लगावला आहे.
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर पालकमंत्री रमेश जारकीहोळी नेहमीच टोलेबाजी करतात. परस्परविरोधी विधाने करून राजकीय वर्तुळात हेवेदावे करण्यात येतात.
बेळगावमधील पी एल डी बँकेच्या निवडणुकीच्या प्रारंभापासून रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. हे शाब्दिक वाद संपूर्ण राज्यात परिचित आहेत. सुमारे दीड वर्षांपासून दोघांच्यात हा वाद सुरु आहे. प्रसारमाध्यमांसमोर एकमेकांविरोधात नवनवी वादग्रस्त विधाने उभयतांकडून केली जातात.
आज एका कार्यक्रमावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना या वादाला पुन्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी वाचा फोडली असून भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे आपण पालन करतो असे सांगितले.
गेल्या सहा महिन्यांपासून आपण लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात एकही विधान केले नसल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच बेळगाव ग्रामीण मतदार संघात आगामी निवडणुकीत भाजपचा उमेदवार उभा करून निश्चितपणे निवडून आणण्याचा निर्धारही व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या रमेश जारकीहोळी, सुधाकर, एस. टी. सोमशेखर, नारायणगौड आणि अनेक नेत्यांनी भाजपमध्ये उत्तमरीत्या कामगिरी केली आहे. कोणत्याही जिल्ह्याच्या प्रवासादरम्यान त्याठिकाणी असलेल्या भाजप कार्यालयाला भेट देऊन त्या – त्या विभागातील कामांची आणि इतर गोष्टींची चर्चा आणि पाठपुरावा करण्यात येतो. भाजप हायकमांडकडून घालून दिलेली लक्ष्मण रेषा आपण कधीही ओलांडत नाही. असे त्यांनी सांगितले.