बेळगांव शहर उपनगरात आज सायंकाळी 4:45 च्या सुमारास अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावण्यास सुरुवात केली. या पावसामुळे ढगाळ वातावरणात हवेत कांहीसा गारवा निर्माण झाला होता.
पावसाळा संपला असे वाटत असताना डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आज सायंकाळी 4:45 च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या तुरळक सरी पडण्यास सुरुवात झाली.
ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात होताच आता जोराच्या सरी कोसळणार की काय? या भीतीने घराबाहेर पडलेल्या लोकांची तारांबळ उडाली. त्याचप्रमाणे गृहिणींची घराबाहेर सुकण्यास घातलेले कपडे घरात आणण्यासाठी एकच धावपळ उडाली होती.
तथापि पावसाचा जोर वाढला नाही. जवळपास अर्धा तास तुरळक पाऊस पडत राहिला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात कांहीसा गारवा निर्माण होऊन ढगाळ वातावरण सायंकाळपर्यंत कायम होते.
ग्रामीण भागात सध्या सुगीचे हंगाम जोरात सुरू आहे अश्यात डिसेंम्बर महिन्यात पाऊस वातावरण बनल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले होते.