सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामात कधीही त्रुटी झाल्या नाहीत तर नवलच. बेळगावच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये हजारो चुका बाहेर येतात. त्यातल्या त्यात बेळगावमधील गावे, शहर, चौक, उपनगर अशा अनेक ठिकाणच्या नावांची सार्वजनिक बांधकाम खात्याला ‘ऍलर्जी’ आहे. दिशादर्शक फलक असुदे किंवा नामफलक सार्वजनिक बांधकाम खाते नेहमीच या नावाच्या बाबतीत जावईशोध लावत असते.
बेळगावमधील अनेक गावाच्या शेजारी असलेल्या महामार्गाच्या रस्त्यावर अनेक फलक लावण्यात आले आहेत. कन्नडचे इंग्रजी आणि इंग्रजीचे भाषांतर कोणतेही ताळतंत्र न ठेवता केले जाते. अनेक गावच्या नामफलकांवर त्या गावातील जनसंख्येएवजी आत्मा असं उल्लेख करण्यात आला आहे.
याची चर्चा जोरदार सुरु असतानाच बेळगाव तालुक्यातील उत्तरेकडे असणाऱ्या अगसगे गावचे नामकरण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या जावईशोधानंतर या खात्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा सवाल ग्रामस्थांच्यावतीने उपस्थित करण्यात येत आहे.
बेळगावमधील अशा अनेक ठिकाणांची नावे याआधीच बदलण्यात आली आहेत. बेळगावचे बेळगावी, मजगावचे मजगावी, वडगावचे वडगाव अशी अनेक ठिकाणची नावे बट्ट्याबोळ करण्यात आली आहेत. यासंदर्भात अनेकदा आवाज उठविण्यात आला आहे. परंतु एकामागावून एक चुका करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अशा चुका करणे हे अंगवळणी पडले आहे. तालुक्यातील अगसगे हे गाव अगसगा या नावानेही ओळखले जाते.
परंतु या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने बसविण्यात आलेल्या ‘माईलस्टोन’ वर अगसगे किंवा अगसगा या नवा ऐवजी या गावचे नाव अगसगी करण्यात आले आहे. या ‘माईलस्टोन’ची चर्चा ग्रामस्थ आणि या मार्गावरून जाणाऱ्या लोकांमध्ये चांगलीच रंगली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावावर हे सर्व लोक ताशेरे ओढत आहेत.
कोणत्याही गावचे, विभागाचे, त्या ठिकाणचे नाव हे कोणत्या ना कोणत्या पार्श्वभूमीवर ठेवण्यात येते. काहीवेळा त्या – त्या भागातील वैशिष्ट्यामुळे त्या गावांना ती नावे देण्यात आली आहेत. त्या गावची किंवा त्या ठिकाणाची ओळख ही त्या नावातून दर्शविली जाते. परंतु बेळगावमधील प्रत्येक ठिकाणाची नावे मनमानीप्रमाणे बदलण्याचा विडा उचललेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि सरकारी यंत्रणेने याचा कधीही विचार केलेला आढळून येत नाही. कधी नाव बदलणे तर कधी फलकावर असंख्य चुका करणे हे आता या कर्मचाऱ्यांच्या अंगवळणी पडले आहे.
वाहतुकीच्या एकही नियमाचे उल्लंघन एखाद्या सर्वसामान्य नागरिकाने केले तर त्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. परंतु सरकारी कामांमध्येच अशा चुका करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल का? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.