बेळगावच्या मानबिंदूतील एक महत्वाचा घटक असणारे सार्वजनिक वाचनालय अडचणीत आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात आज ऍड. नागेश सातेरी, प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, अनंत जाधव यांनी बैठक घेऊन एक निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे.
सार्वजनिक वाचनालय ही सीमाभागातील मराठी जनतेचा मानबिंदू असणारी संस्था आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्वात जुनी संस्था अमृतमहोत्सवात पदार्पण करीत आहे. परंतु ही संस्था अडचणीत येण्याच्या मार्गावर आहे. दि. ३० नोव्हेंबर २०२० रोजी वाचनालयाच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नव्या संचालकांची निवड करण्यासंदर्भात आवश्यक असणाऱ्या तांत्रिक गोष्टी काटेकोरपणे पाळाव्यात, असेही ठरवण्यात आले. या गोष्टींचे पालन करण्याची जबाबदारी संचालक मंडळाची आहे. प्रत्येक टप्प्यावर संचालक मंडळाची बैठक घेऊन ठराव मांडणे गरजेचे असते.
या संस्थेसाठी उपरोक्त चौघांनीही कार्यवाह नेताजी जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना यासंबंधी सर्व सूचना दिल्या. परंतु त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर अध्यक्ष गोविंद राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. म्हणून १५ डिसेंबर रोजी उपरोक्त चौघांनी अध्यक्षांच्या नावे एक पत्र इमेलद्वारे पाठविले. या पत्राद्वारे सांस्थेचे हितरक्षण करण्याचा हेतू संबंधितांना समजावून सांगण्यात आला. परंतु याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप ऍड. नागेश सातेरी, प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, अनंत जाधव यांनी केला आहे.
कोणत्याही तांत्रिक बाजूची पूर्तता न करता अध्यक्ष गोविंद रोवून आणि कार्यवाह नेताजी जाधव संस्था अडचणीत आणत आहेत. कृष्णा शहापूरकर हे उपाध्यक्ष असूनही त्यांना कोणत्याच पद्धतीची माहिती न देता अंधारात ठेवण्यात येत आहे. तसेच इतर संचालकांनाही अंधारात ठेवण्यात येत आहे. परंतु उपरोक्त चार जण वगळता इतर संचालक यासंदर्भात कोणतेही भाष्य करीत नाहीत, असेही या निवेदनात म्हटले आहे.
कोणत्याही व्यक्तीपेक्षा संस्था श्रेष्ठ आहे, शिवाय सीमाभागातील मराठी जनतेचा मानबिंदूसलेली ही संस्था कोणाच्याही मनमानी आणि लहरीपणामुळे अडचणीत येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असून यासंदर्भात जनतेला सर्व माहिती मिळावी, यासाठी हे निवेदन प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे.