बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी अत्यंत संथ गतीने झाल्यामुळे सुमारे 3 हजार पोलिसांना बंदोबस्तासाठी बुधवारची रात्र रस्त्यावर जागून काढावी लागली. मतमोजणीस विलंब होण्यास सहाय्यक मतपत्रिका कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. यावेळी 25 -25 मतांचे गठ्ठे करून मतमोजणी केली जात होती. आरक्षित गटातील उमेदवाराला सर्वसाधारण गटातील उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाल्यास आरक्षित उमेदवार विजयी ठरण्याच्या नियम अंमलबजावणीमुळे यावेळी मतमोजणीला खूप वेळ लागला. मागील ग्रामपंचायत निवडणुकीप्रसंगी 481 ग्रामपंचायतींची मतमोजणी रात्री 10 वाजता पूर्ण झाली होती. मात्र यावेळी रात्री 11 नंतर देखील मतमोजणी सुरूच होती.
मतमोजणीची प्रक्रिया लांबल्यामुळे मतमोजणीसाठी आणि गावागावातील संवेदनशील भागात बंदोबस्तास ठेवण्यात आलेल्या सुमारे 3 हजार पोलिसांना कालची रात्र जागून काढावी लागली. पोलिसांना रात्रीचे जेवण बंदोबस्ताच्या ठिकाणीच करावे लागले. निवडणूक कर्मचारी देखील मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी थांबून होते. आरक्षित गटातील मते सर्वसाधारण गटाकडे वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे मतमोजणी संथगतीने झाली. संपूर्ण राज्यात हा प्रकार झाला असल्याचे तसेच एकंदर ग्रामपंचायत निवडणूक जिल्ह्यात शांततेत पार पडल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
दरम्यान, राज्यातील 5,726 ग्रामपंचायतींमधील 82,616 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी देखील बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यंदा सुमारे 3 लाख उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर झाली नसली तरी विविध पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. या निवडणुकीच्या निकालावर राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात होते.