रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील एका युवतीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे रामदेव गल्लीत एकच खळबळ उडाली.
ऐश्वर्या सुनील पोटे (वय 22) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नांव आहे. तिच्या पश्चात आई व लहान बहीण असा परिवार आहे. मूळची शहापूर, बेळगांव येथील रहिवासी असलेल्या ऐश्वर्याची आई बेंगलोर येथे घरकाम करते.
वडिलांचे दहा वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर ऐश्वर्या रामदेव गल्ली पिरनवाडी येथील आपल्या मामाच्या घरी आपल्या लहान बहिणी समवेत राहत होती. ती खानापूर रोड बेळगांव येथील एका मार्टमध्ये नोकरीला होती.
आज सकाळी आजूबाजूच्या लोकांनी ऐश्वर्याला कपडे धुऊन वाळत घालताना पाहिले होते. परंतु त्यानंतर घरामधील स्वतःच्या खोलीत तिचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.
तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नसले तरी प्रेम प्रकरणातून तिने जीव दिला असावा, असा कयास आहे. याप्रकरणी वडगांव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.