बेळगांव शहर आणि तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांकडून भाताची थेट खरेदी करता यावी यासाठी सरकारी हमी भावाप्रमाणे बेळगांवात तात्काळ खरेदी -विक्री केंद्र सुरु करावे, अशी मागणी बेळगांव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे.
बेळगांव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवार सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेत असतात भात पीक हे त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. सध्या बेळगाव तालुक्यात भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाताचा बाजार भाव फारच कमी आहे.
सध्या बेळगांव शहर व तालुक्यातील शेतकर्यांना तो परवडणारा नाही. भात उत्पादन खर्च खूप आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात पीक घेतले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली आहे. तेंव्हा या सर्व बाबी ध्यानात घेऊन सरकारी हमी भावाप्रमाणे बेळगांवात तात्काळ भात खरेदी -विक्री केंद्र सुरू केले जावे, अशा आशयाचा तर्फे निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या समवेत बेळगांव तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस एल. आय. पाटील, अध्यक्ष निंगोजी हुद्दार, उपाध्यक्ष ॲड. राजाभाऊ पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, आर. आय. पाटील एस. एल. चौगुले, ॲड. श्याम पाटील, दत्ता उघाडे, आर. के. पाटील, एल. के. पाटील, सुधीर चव्हाण, एम. ए. हेगडे, के. वाय घाटेगस्ती आदी उपस्थित होते.