महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बैलगाडी शर्यतींचा बेताज बादशाह हरण्या या तगड्या बैलाचे बुधवारी सकाळी निधन झाले. कुदनुर (ता. चंदगड) येथील शंकर दत्तू आंबेवाडकर (मेस्त्री) ज्यांच्या मालकीच्या असणाऱ्या हरण्याच्या निधनामुळे आंबेवाडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुदनुरसह संपूर्ण चंदगड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कुदनुर (ता. चंदगड) येथील माजी जि. पं. सदस्य शंकर आंबेवाडकर (मेस्त्री) हे बैलगाडी शर्यतीचे शौकीन असून गेल्या 40 वर्षांपासून आंबेवाडकर परिवार शर्यतीचे बैल तयार करतात. शंकर आंबेवाडकर यांनी शर्यतीसाठी गेल्या 2018 साली हरण्या बैलाला मुंबई येथून खरेदी करून आणले होते. त्यानंतर त्यांनी पौष्टिक खुराक देण्याबरोबरच कसून सराव करून घेण्याद्वारे हरण्याला बैलगाडी शर्यतीसाठी पूर्णपणे तयार केले होते.
त्यामुळे हरण्या बैलाने अल्पावधीत कोल्हापूर जिल्ह्यासह बेळगांव, हावेरी आणि धारवाड जिल्ह्यांमधील बैलगाडी शर्यती जिंकून आपला दबदबा निर्माण केला होता. एकामागोमाग एक शर्यती जिंकणाऱ्या हरण्याच्या जीवावर आंबेवाडकर यांनी आणखी चार बैल खरेदी केले होते. हरण्यावर जीवापाड प्रेम करणारे कुदनुरचे शंकर आंबेवाडकर आणि त्यांचे चिरंजीव महांतेशनगर बेळगांव येथील विनायक आंबेवाडकर त्याला घरचा एक सदस्यच मानत होते.
शर्यतींचा बेताज बादशाह असा नावलौकिक कमावलेल्या हरण्याच्या पायाला गेल्या 20 दिवसापूर्वी जखम झाली होती. ही जखम चिघळल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असताना उपचाराचा फायदा न होता काल बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास हरण्याचे निधन झाले.
कुदनुर येथील शंकर आंबेवाडकर यांच्या शेतातील माळावर हरण्या बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुदनुरवासीय बहुसंख्येने उपस्थित होते. बैलगाडी शर्यतींच्या ऐनहंगामात या एक नंबरच्या बैलाचे निधन झाल्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील बैलगाडी शर्यत शौकिनांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.