स्मार्ट सिटी विकास कामाच्या नांवाखाली चिदंबरनगर येथील एक सुमारे 40 -45 वर्षे जुना वृक्ष तोडण्यात आल्यामुळे वृक्ष प्रेमींसह नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगांव स्मार्ट सिटी लिमिटेडने बेळगांव सुंदर करण्याएवजी ते भकास करण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्या अनुषंगाने शहर परिसरात वृक्षांची कत्तल केली जात आहे. दिगंबरनगर येथे देखील आज मंगळवारी हा प्रकार घडला, जेंव्हा एक सुमारे 40 -45 वर्षे जुना वृक्ष युद्धपातळीवर तोडण्यात आला.
अज्ञाताकडून ही कारवाई करण्यात आली असली तरी स्मार्ट सिटी विकास कामांतर्गत संबंधित वृक्ष तोडण्यात आला असल्याचे समजते.
या वृक्षतोडीचे निश्चित कारण समजू शकले नाही. तथापि सरकारी वन कंत्राटदाराच्या ट्रकमधून तोडलेल्या वृक्षाचे ओंडके झटपट नेण्यात आले. रस्त्याकडेला असलेला हा मजबूत पूर्ण वाढ झालेला वृक्ष जमीनदोस्त करण्यात आल्यामुळे वृक्ष प्रेमींसह परिसरातील नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत होती.
याबाबत वन प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वन खात्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे याची चौकशी करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावर वन अधिकारी काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागले आहे .