शेतात औषध फवारणीसाठी पाणी आणण्यास जाऊन विहिरीत पाय घसरून पडल्यामुळे एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी मुतगा (ता. बेळगांव) येथे घडली.
रामचंद्र बाळू पाटील (वय 63) असे विहिरीत बुडून मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी वृद्धाचे नांव आहे. रामचंद्र पाटील हे आपल्या मुलांसमवेत आज सायंकाळी 4 च्या सुमारास शेतातील कडपाळवर औषध मारण्यासाठी आपल्या शेतात गेले होते.
औषध फवारणीसाठी पाण्याची गरज असल्यामुळे आपल्या मुलाला शेतात थांबून जवळच सुमारे दोनशे फुटांवर उसाच्या फडात असलेल्या विहिरीतील पाणी आणण्यासाठी रामचंद्र गेले होते.
एक हंडा विहिरीतील पाणी काढल्यानंतर दुसऱ्यांदा विहिरीत उतरून पाणी आणताना रामचंद्र शेवाळावर पाय घसरून विहिरीत पडले. पाणी आणण्यास गेलेले आपले वडील बराच वेळ झाला तरी परत न आल्यामुळे रामचंद्र यांचा मुलगा विहिरीकडे गेला असता त्याला विहिरीच्या काठावर वडिलांचे चप्पल आणि पाण्याचा एक हंडा तसेच विहिरीतील पाण्यामध्ये आणखी एक हंडा तरंगताना आढळून आला.
दुर्घटनेची जाणीव झाल्याने त्याने तात्काळ आपल्या काकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जमलेल्या सर्वांनी पंपाने पाण्याचा उपसा केला असता रामचंद्र पाटील यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.
या घटनेची माहिती मारीहाळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाडला. सदर घटनेची मारिहाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.