कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या एका शेतकरी खातेदाराला त्याच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज देण्यास बँकेच्या हिंडलगा शाखेकडून टाळाटाळ करून मनस्ताप दिला जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सुळगा उचगांव येथील तिघा शेतकरी भावांनी कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या हिंडलगा शाखेमधून पॉवर ट्रिलर खरेदीसाठी आपल्यापैकी एकाच्या नावावर 90 हजार रुपयांचे कर्ज काढले होते. मात्र ज्याच्या नांवावर कर्ज होते त्याचे निधन झाल्यामुळे दुसऱ्या शेतकरी भावाने बँकेच्या विनंतीवरून कोर्टाच्या मध्यस्थीने ओटीएसद्वारे कर्जाची परतफेड केली होती. त्यावेळी बँकेने कर्जाची परतफेड केल्यास भविष्यात आम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज तुम्हाला देऊ, असे आश्वासन त्या शेतकऱ्याला दिले होते.
मयत भावाच्या नावावरील कर्जाची संपूर्ण परतफेड करणाऱ्या संबंधित शेतकऱ्याला आता मुलीच्या वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्जाची गरज आहे. यासाठी त्याने कर्नाटक विकास ग्रामीण बँकेच्या हिंडलगा शाखेच्या व्यवस्थापकांकडे कर्ज मंजूर करण्याची मागणी केली आहे. बँकेने दिलेल्या आश्वासनाच्या भरोशावर सध्या लोकांकडून हात उसने घेऊन त्याने मुलीच्या पहिल्या वर्षाची सुमारे सव्वा लाख रुपये शैक्षणिक फी भरली आहे. कर्ज मंजूर व्हावे यासाठी सदर शेतकऱ्याची दोन्ही मुले बँकेचे उंबरठे झिजवत आहेत. तथापि बँकेच्या व्यवस्थापकांनीकडून अरेरावीच्या उद्धट वर्तनाबरोबरच कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. या प्रकारामुळे एका प्रतिभावंत हुशार मुलीचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याबरोबरच संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडल्यामुळे नागरिकांसह अन्य खातेधारकांमध्ये व्यक्त होत आहे.