कोरोनाचा नवा विषाणू आणि अलीकडे इंग्लंडहून आलेले प्रवासी शोधून काढण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकार गर्दीच्या कार्यक्रमांना प्रतिबंध करत आहे. या प्रतिबंधाचा फटका नववर्षाच्या स्वागत कार्यक्रमांना बसणार असून बेळगांवसह कांही प्रशासनांनी नववर्षाच्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे.
कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर यंदा नववर्षाचे कोणतेही कार्यक्रम आणि डीजे पार्ट्या होणार नाहीत. हॉटेल, बार, रेस्टॉरंट आणि क्लब सुरू राहणार असले तरी दरवर्षीप्रमाणे नूतन वर्षाचे स्वागत सार्वजनिकरित्या करता येणार नाही. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी रात्री ओल्ड मॅन दहनाच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. यंदा ही गर्दी टाळण्यासाठी ओल्ड मॅन दहनाच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि भादंवि कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शहरवासीयांनी घरांमध्ये साध्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करून प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करावे, असे आवाहन देखील केले आहे.