लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना अपमानास्पद वागणूक देऊन लोकशाहीची गळचेपी करण्याचा संतापजनक प्रकार निपाणी नगरपालिकेमध्ये आज बुधवारी घडला. नगराध्यक्षांसह खासदार आणि आयुक्तांनी सर्वसाधारण बैठकीचे वृत्तांकन करण्यास पत्रकारांना विरोध करून त्यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढल्याने संतप्त पत्रकारांनी ठिय्या आंदोलन करून तीव्र निषेध नोंदविला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निपाणी नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी नेहमीप्रमाणे पत्रकार बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. तथापि बैठकीला प्रारंभ होण्यापूर्वी नगरपालिका आयुक्त महावीर बोरणावर यांनी पत्रकारांना बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी नाही असे सांगितले. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्यासह खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि काही नगरसेवकांनी देखील पालिका आयुक्तांची री ओढून पत्रकारांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. याला पत्रकारांनी विरोध दर्शवून जाब विचारला आणि त्यावरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर पोलिसांच्या सहाय्याने पत्रकारांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढण्यात आले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी सभागृहाबाहेर नगरपालिका कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडून जोरदार निदर्शने केली. यावेळी पत्रकारांना डावलणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो!, आयुक्तांचा धिक्कार असो!, पत्रकारांचा अवमान सहन करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा धिक्कार असो!! आदी घोषणा देऊन पत्रकारांनी नगरपालिका कार्यालय दणाणून सोडले होते. पत्रकारांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून पालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांसह अन्य कांही नगरसेवकांनी आंदोलनात सहभागी होऊन पत्रकारांना पाठिंबा दर्शविला.
सदर घटनेची माहिती मिळताच माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, युवानेते उत्तम पाटील आदी मान्यवरांनी आंदोलन करणाऱ्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच वृत्तांकनास आलेल्या पत्रकारांना नगरपालिकेच्या सभागृहातून बाहेर हाकलणे ही चक्क लोकशाहीची गळचेपी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नगरपालिकेत निषेध नोंदवून आंदोलन छेडल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी प्रांताधिकारी युकेशकुमार आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. पत्रकार समाजातील अन्याय आणि समस्या विरुद्ध आवाज उठवत असतात. जनतेशी संबंधित समस्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकांमध्ये चर्चा होत असते. ग्रामपंचायतीच्या बैठकीपासून ते संसदेतील बैठकीप्रसंगी सभागृहांमध्ये पत्रकारांसाठी खास जागा राखून ठेवलेली असते. ही वस्तुस्थिती असताना निपाणी नगरपालिकेत घडलेला हा प्रकार निषेधार्ह असून असा प्रकार भविष्यात पुन्हा घडू नये. पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
दरम्यान, जनतेशी संबंधित विषयांवर चर्चा होत असल्यामुळे निपाणी नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक सर्वसाधारण सभेला पत्रकारांना हजर राहू दिले जात होते. आज पर्यंतच्या कोणत्याही नगराध्यक्ष अथवा आयुक्तांनी पत्रकारांना बैठकीस हजर राहण्यास मज्जाव केला नव्हता. ही परंपरा खंडित करण्यासाठी तसेच एकाधिकारशाही आणण्याबरोबरच नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकवण्याचा संदर्भात होणाऱ्या चर्चेला बगल देण्याच्या उद्देशाने जाणून-बुजून वरीलप्रमाणे पत्रकारांना दुखावण्यात आले असल्याचा आरोप केला जात आहे
निपाणीत पत्रकारांचे धरणे आंदोलन
खासदार अण्णासाहेब जोलले,आयुक्त बोरणाववर, नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी पत्रकाराशी असभ्य वर्तन केल्याच्या विरोधात पत्रकारांचे धरणे आंदोलन-पत्रकार आक्रमक झालेले पाहून खासदार सामोरे जाण्याऐवजी गेले निघून-निपाणी नगरपालिकेत पहिल्या बैठकीत भगव्या ध्वजा बाबत चर्चा होते मात्र ही परंपरा खंडित पाडून या विषयाला बगल दिली होती बगल-त्यामुळे तापले होते वातावरण
https://www.facebook.com/375504746140458/posts/1279831815707742/