कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागताच खबरदारीसाठी कठोर पावले उचलण्यात आली आहेत. कर्नाटक सरकारने आजपासून नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. यादरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून 2 जानेवारी पर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. मात्र यादरम्यान बस, रेल्वे आणि विमानसेवा सुरु असणार आहेत.
ब्रिटनमध्ये उसळलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जगाला पुन्हा धास्ती लागली आहे. यादरम्यान पुन्हा संशयित आणि लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांची चाचणी, विलगीकरण करण्यात येणार आहेत. यावेळेत पुन्हा नव्या रुग्णांची भर होण्याचीही शक्यता तज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
SARS- CoV २ हा विषाणू नव्याने निदर्शनास आला असून याची सुरवात युनायटेड किंगडम येथून झाली आहे. हा विषाणू अत्यंत झपाट्याने पसरत असून याची वाढदेखील वेगाने होत आहे. यासोबतच युनायटेड किंगडम मधून आलेल्या नागरिकांचे कोविड रिपोर्टसही पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. याच विषाणुतून पुन्हा नव्या विषाणूची उत्पत्ती झाली आहे का? याची चाचणी घेण्यात येत आहे. सध्या SARS-CoV २ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि राज्यात यासंदर्भात खबरदारी घेण्यासाठी राज्य कार्यकारिणी समितीने नाईट कर्फ्यू घोषित करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केली असून यासंदर्भात घेण्याविषयीच्या उपाययोजना आणि खबरदारींबाबत प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत.
यादरम्यान कोणत्याही प्रकारच्या मालवाहतुकीसाठी निषेध करण्यात आला नाही. शिवाय रिकामी गाड्यांची वाहतूकही याकाळात करण्यासाठी परवानगी आहे. ज्या ज्या ठिकाणी कारखाने आहेत, किंवा जे उद्योग रात्रीच्या वेळेस काम करतात अशा ठिकाणी ५० टक्के कर्मचारी घेऊन काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.
यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयडेंटिटी कार्ड देण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या, बसेस आणि रेल्वेसेवाही याकाळात सुरु असणार आहेत. तसेच बस, रेल्वे, विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या टॅक्सी, ऑटोरिक्षा चालकांनाही परवानगी देण्यात आली आहे. ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण २५ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो. यासाठी २४ डिसेंबरच्या मध्यरात्री ख्रिस्ती बांधवांना चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जाण्यासही परवानगी देण्यात आली आहे.