तब्बल 17 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बेळगांव पोलीस आयुक्तालय इमारतीचा कोनशिला समारंभ आज मंगळवारी सकाळी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
शहरातील लिंगराज कॉलेज मागील सिटी पोलीस लाईन परिसरात आज सकाळी या बेळगांव पोलीस आयुक्तालय कार्यालय इमारतीच्या कोनशिला समारंभचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते नियोजित पोलीस आयुक्त कार्यालय इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आदी लोकप्रतिनिधींसह केएसआरपी एडीजीपी आलोक कुमार, बेळगांव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एच. जी. राघवेंद्र सुहास, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष्मण निंबरगी आदींसह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी, निमंत्रित व हितचिंतक उपस्थित होते.
सिटी पोलीस लाईन येथील एकूण 2 एकर 20 गुंठे जागेमध्ये ही बेळगाव पोलीस आयुक्तालयाची भव्य इमारत उभी केली जाणार आहे. या इमारत बांधकामासाठी 17 कोटी रुपये खर्च केले जाणार असून सुमारे 15 महिन्यात या बहुमजली इमारतीचे काम पूर्ण केले जाणार आहे. नियोजित बेळगाव पोलीस आयुक्तालय इमारत एकूण चार मजली असणार असून पहिल्या मजल्यावर कार पार्किंगची सोय असणार आहे. त्याच प्रमाणे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर प्रशासकीय कचेऱ्या असतील.