सरकारी कार्यालये व शाळांमध्ये लावण्यात आलेले राष्ट्रपुरूषांचे फोटो सुस्थितीत असावेत, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सध्या पदावर असलेले राष्ट्रपती व पंतप्रधानांचा फोटो कार्यालयात असावा, असेही सुचविण्यात आले आहे.
शाळा आणि सरकारी कार्यालयामध्ये विविध महापुरुषांचे फोटो लावले जातात. राष्ट्रपुरुषांच्या बरोबरीने नेत्यांचे फोटोही लावल्याचे दिसून येते. मात्र, एखादा फोटो लावल्यानंतर त्याची योग्य देखभाल घेतली जात नाही. त्यामुळे काही शाळा व कार्यालयातील फोटो खराब झाल्याचे दिसून येते. याबद्दल सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत असते.
बंगळूरमधील एका व्यक्तीने माहिती हक्क कायद्याच्या आधारे (आरटीआय) सरकारी कार्यालये व शाळांमध्ये कुणाचे फोटो लावावेत याबाबत काहीनियम आहेत का, याची विचारणा केली होती.
याबाबत उत्तर देताना सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सध्या पदावर असलेले राष्ट्रपती व पंतप्रधानांचा फोटो कार्यालयात असावा, असे सांगितले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नानंतर सरकारने याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.