मुतगा (ता. बेळगांव) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धूळ चारून ग्राम विकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. ग्राम विकास आघाडीच्या पॅनलने 19 पैकी 14 जागा जिंकून ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज बुधवारी जाहीर होताच मुतगा ग्राम विकास आघाडीच्या पॅनलमधील विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी उमेदवारांना पुष्पहार घालून आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपस्थित विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी छ. शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. मुतगा ग्राम विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये माजी ग्रा. पं. सदस्या रेश्मा श्रीकांत पाटील, स्नेहल अजित पुजारी, भारता भैरू पाटील, शीला राजू मल्लोगोळ, माजी ग्रा. पं. सदस्य किरण कल्लाप्पा पाटील, सुधीर सयाजी पाटील, भालचंद्र श्रीकांत पाटील, प्रभाकर उर्फ संजय धोंडीबा पाटील, बबीता महेश पाटील, वनश्री बापू पाटील, श्याम गंगाधर मुतगेकर, मारुती पुजारी, भागाना विठ्ठल मल्लोगोळ आदींचा समावेश आहे.
आपल्या पॅनलच्या विजयासंदर्भात बेळगांव लाईव्हशी बोलताना ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर म्हणाले की, मुतगावासीय गेल्या वीसएक वर्षापासून गावाच्या विकासाच्या दृष्टीने पर्याय शोधत होते. यासाठीच त्यांनी यावेळी ग्राम विकास आघाडीला 19 पैकी 14 जागांवर विजय मिळवून दिला आहे. भविष्यकाळातील सर्व अडचणींवर मात करून गावाच्या सर्वांगीण विकासाबरोबर आम्ही आपली संस्कृती आणि भाषा टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आमचे समस्त 14 सदस्य आम्हाला साथ देणार आहेत. माजी ता. पं. सदस्य शामराव पाटील, नारायण कणबरकर, मनोहर कडेमनी आदी ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आचारविचारांवर आम्ही प्रस्थापितांना हरवून हे यश संपादन करू शकलो असे सांगून या मंडळींसह समस्त गावकऱ्यांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही सुनील अष्टेकर यांनी दिली