बेळगावमध्ये दीड महिन्यांपूर्वी झालेल्या रावडी हत्येप्रकरणातील संबंधित आरोपींना अटक करण्यात माळमारुती पोलिसांना यश आले आहे. बेळगाव तालुक्यातील मुत्यानट्टी गावातील लक्ष्मण दड्डी नामक आरोपीला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.
२६ ऑकटोबर रोजी मध्यरात्री मित्राच्या मुलाची वाढदिवसाची पार्टी आटोपून घरी परतणाऱ्या रावडी शहाबाज पठाण याचा पाठलाग करत त्याच्यावर मागून वार करून त्याच्या भीषण खून करण्यात आला होता. शहाबाज पठाण याचसोबत झालेल्या वादातून पुढे याचे पर्यवसन हाणामारीत झाले होते. दरम्यान पूर्ववैमनस्यातून त्याचा काटा काढण्यासाठी कट रचून त्याच्या खुनाची सुपारी देण्यात आली होती. यासंदर्भात माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
सुरुवातीला मुत्यानट्टी येथील काही युवकांच्या सोबत झालेल्या क्षुल्लक वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. यासंबंधी माळमारुती पोलिसांनी मुत्यानट्टी गावातील बसवराज दड्डी (वय २४) आणि बसवानी नाईक (वय २७) या दोघांना अटक केली होती. परंतु या प्रकरणाचा आणि खुनाचा थेट संबंध नसून शहाबाज याचा काटा एका जुन्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी आरोपी लक्ष्मण दड्डी याच्या मुलावर शहाबाज याने प्राणघातक हल्ला केला होता. हा द्वेष मनात ठेऊन लक्ष्मण दड्डी याने शहाबाज याच्या खुनाची सुपारी दिली होती. दीड महिन्यापूर्वी झालेल्या खुनानंतर लक्ष्मण दड्डी हा फरारी होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना याचा संशय येताच लक्ष्मण दड्डी याचा तपास घेऊन त्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.