बेळगांव येथून सकाळच्या सत्रात बेंगलोरला ये -जा करण्यासाठी विमान सेवा सुरू करण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन स्टार एअर कंपनीने येत्या 18 डिसेंबरपासून बेळगांव -बेंगळूर -बेळगांव अशी विमान फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच यासाठी कंपनीने बुकिंगही सुरू केले आहे.
मागील महिन्यापासून स्पाइस जेट कंपनीने आपली बेंगलोर विमान सेवा बंद केली आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात बेंगलोरला ये -जा करण्यासाठी विमान उपलब्ध नसल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये विमान फेरी सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली जात होती. स्पाइस जेटची विमान फेरी बंद झाल्यानंतर या काळात नवी विमान फेरी सुरू करण्यासाठी बेळगांव विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात होते. अखेर हे प्रयत्न फळाला आले असून स्टार एअर कंपनीने 18 डिसेंबर पासून बेंगलोर फेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
घोडावत ग्रुप आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस स्टार एअर विमान फेरी सुरू करत आहे. बेळगांव विमानतळावरून सकाळी 08:55 वाजता या विमानाचे उड्डाण होणार असून सकाळी 10 वाजता ते बेंगलोर विमानतळावर पोहोचणार आहे. त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासासाठी सकाळी 10:30 वाजता बेंगलोर येथून निघणारे हे विमान 11:35 वाजता बेळगांवला पोहोचणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगांवला उपराजधानीचा दर्जा देऊन येथील सुवर्ण विधानसौधमध्ये अनेक सरकारी कार्यालय आणण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बेंगलोर येथून बेळगांवला ये -जा सुरू असते. त्याचबरोबर बेळगांवहुन सकाळी बेंगलोरला जाऊन पुन्हा सायंकाळी बेळगांवला परतणार्या व्यापारी व उद्योजकांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात विमान फेरी सुरू करण्याची मागणी केली जात होती. आता ही मागणी पूर्ण झाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.