महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक जत्ती मठ येथे शुभम शेळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .बैठकीच्या सुरवातीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवण्यासाठी येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराना भरघोस मतांनी निवडून देऊन सर्व ग्रामपंचायतीवर समितीचा भगवा फडकवावा असे आवाहन युवा समितीच्या वतीने करण्यात आले.
मराठी भाषिकांनी मराठी भाषिकांना जी दुय्यम वागणूक मिळते त्याचे उत्तर सरकारला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून द्यावे, महाराष्ट्र एकीकरण समिती या पॅनल खालीच सर्व गावांनी ही निवडणूक लढवावी अशी सूचना यावेळी करण्यात आली जेणेकरून राष्ट्रीय पक्षाकडून नंतर दगाफटका होणार नाही.
तसेच देशभर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा पाठिंबा दर्शविण्यात आला आणि सरकाने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात असा ठराव करण्यात आला.
त्याचबरोबर मराठा प्राधिकरणाला विरोध करत तो रद्द करत नंतर महामंडळाला सुद्धा विरोध करून मराठा आणि मराठी विरुद्ध बंद पुकारणाऱ्या कानडी संघटनांचा आणि त्यांना अनुदान देऊन पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला.
बेळगाव महानगर पालिकेकडून व्यावसायिकांना कन्नड फलकांसाठी नोटीस बजावून परवाने रद्द करण्याची आणि दुकानांना टाळे ठोकण्याची धमकी देत आहेत त्या दंडेलशाही विरुद्ध येत्या बुधवार रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना युवा समितीच्या वतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीला युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष संतोष कृष्णाचे, सरचिटणीस श्रीकांत कदम, अभिजित मजुकर, सुरज कुडूचकर, अश्वजित चौधरी, अभिषेक काकतीकर, मनोहर हुंदरे, प्रवीण कोराने, विनायक कावळे, प्रतीक पाटील, वासू सामजी, चंद्रकांत पाटील, किरण मोदगेकर, प्रकाश हेब्बाजी, साईनाथ शिरोडकर, मनोहर शहापुरकर, शांताराम होसुरकर आदी उपस्थित होते.


