महानगरपालिकेचे सभागृह तहकूब झाल्यामुळे अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अनेक प्रभागांमध्ये कचरा, पिण्याचे पाणी, गटारीच्या समस्या डोके वर काढत असून पालिका प्रशासनाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. शहापूर मधील आनंदवाडी भागातील प्रभाग क्रमांक १५ आणि १६ या भागात मूलभूत सुविधांची अक्षरशः वाणवा उडाली असून येथील स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात आनंदवाडी येथील नागरिकांनी एकत्रित येऊन धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या भागातील गटारी कचऱ्याने तुडुंब भरल्या असून दुर्गंधी पसरली आहे. पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. शिवाय या भागातील कचरा गाडीची व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली असून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीपासून या भागातील कचऱ्याची उचल करण्यात आलेली नाही. सध्या नियमितपणे कचऱ्याची उचल होत नाही. यामुळे या भागात कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. साचत असलेल्या कचऱ्यामुळे डासांचे साम्राज्य वाढले आहे.
या भागात दोन नगरसेवक होते. परंतु या नगरसेवकांनी या भागाच्या सुविधांसाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. प्रभाग क्रमांक १५ आणि १६ या भागातील नागरिकांनी वारंवार मनपा प्रशासन आणि अधिकाऱ्यांना निवेदने आणि तक्रारींचे अर्ज सादर केले आहेत, परंतु याला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद अधिकारी वा प्रशासनाने दिला नाही. वेळोवेळी टॅक्स भरूनही या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे येथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या ४ दिवसात या भागाच्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे पालिकेने पाऊल उचलले नाही, तर शहापूर आणि वडगाव भागात धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील स्थानिकांनी दिला आहे.
यावेळी समासेविका माधुरी जाधव – पाटील, शशिकांत रणदिवे, नारायण पाटील, सुनील सरनोबत, अमृत पाटील, विनय पाटील, सुरज पाटील, सर्फराज इनामदार, कल्पना भांदुर्गे, शोभा गवि, अनुसया पाटील, पार्वती नाईक, लक्ष्मी काकतीकर, सुनंदा पाटील, वासंती पाटील, सैदमा बागवान आदी नागरिक उपस्थित होते.