महाराष्ट्र एकीकरण समितीच सध्या निष्क्रिय झाली असल्याची चर्चा सुरु असून म. ए. समिती नेत्यांनी एकत्रित येऊन येत्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याची मागणी सीमाभागातील तमाम मराठी भाषिक जनता करत आहे. येत्या काळात ग्रामपंचायत निवडणुकांसोबतच महानगरपालिका, लोकसभा, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तालुक्यातील येळ्ळूर विभागातील म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
येत्या २२ आणि २७ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीची रूपरेषा ठरविण्यासाठी म. ए. समितीच्या तालुक्यातील नेत्यांच्या उपस्थितीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जुन्या कमिटी सभासदांची नावे वाचून दाखवून येत्या निवडणुकीसाठी या कमिटीत नव्याने सभासद नोंदणी करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
या निवडणुकीसाठी म. ए. समितीचा उमेदवार कोण असेल? याबाबत कार्यकर्ते आणि नेते यांच्या संगनमताने उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणूक हि तरुणांसाठी असलेली नांदी आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने सहकार्य करून योग्य उमेदवार उभा करून निवडून आणण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच उमेदवार निवडीसाठी लवकरच आणखी एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांच्या संगनमताने उमेदवारी देण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.