सीमाभागात अनेक ठिकाणी साहित्य संमेलने भरविण्यात येतात. डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या कालावधीत तालुक्यात घेण्यात येणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी सीमाभागात मराठी साहित्य महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी (दि. २४) बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या महासंघाच्या कार्यकारिणीवर अध्यक्ष पदी वकील नागेश सातेरी यांची कार्याध्यक्ष गुणवंत पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, कार्यवाह बाबुराव गौंडाडकर, सहकार्यवाह मधू पाटील, सदस्य प्रा. आनंद मेणसे, एम. बी. गुरव, कृष्णा शहापूरकर, सी. वाय. पाटील, परशराम मोटराचे, अँड. सुधीर चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांबाबत सोमवार दि. २८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सीमाभागात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांची रूपरेषा ठरविण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
तसेच साहित्य संमेलनांचे स्वरूप, कोविड पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने साहित्य संमेलने भरवावीत, कायदेशीर रित्या आवश्यक बाबींची पूर्तता करणे, साहित्य संमेलन भरवताना येणाऱ्या अडचणींवर कशा पद्धतीने तोडगा काढणे अशा अनेक गोष्टिंवर चर्चा करण्यात आली.
हा महासंघ सीमाभागात जी साहित्य संमेलने होतात त्यांच्यासाठी कार्यरत राहणार आहे. तसेच साहित्य संमेलनांना मदत करण्यासाठी महासंघ स्थापण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष गुणवंत पाटील यांनी दिली.