केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभेची उमेदवारी अंगडी कुटुंबियातील सदस्याला देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.
त्यानंतर आज दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर अंगडी यांची कन्या श्रद्धा अंगडी – शेट्टर दिसून आली आहे. या कार्यक्रमात अधिकृतरित्या भाजपमध्ये एंट्री घेतल्याचे सुरेश अंगडी यांच्या कन्येने स्पष्ट केले आहे.
सुरेश अंगडी यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर अंगडी समर्थकांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी अंगडी यांच्या कुटुंबीयांनाच द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान कुटुंबियातील कोणत्या सदस्याला उमेदवारी देण्यात येईल? उमेदवारी देण्यात येईल कि नाही? यासंदर्भात चर्चा – उपचर्चांना ऊत आला होता. त्यानंतर सुरेश अंगडी यांची द्वितीय कन्या आणि राज्याचे माजी औद्योगिक मंत्री आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची सून श्रद्धा अंगडी – शेट्टर या शुक्रवारी बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी दिनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसून आल्या असून, आपण अधिकृतरित्या भाजप प्रवेश केला असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा करण्यात आली नाही, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना श्रद्धा अंगडी यांनी स्पष्ट केले.
सुरेश अंगडी यांची कन्या प्रथमच राजकीय व्यासपीठावर दिसल्यामुळे बेळगावमधील भाजपच्या गोटात पुन्हा नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राजकारणात प्रवेश घेतलेल्या श्रद्धा अंगडी यांना माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे उमेदवारी मिळवून देणार का? सुरेश अंगडी यांची कन्या म्हणून भाजप हायकमांड उमेदवारी जाहीर करेल का? या प्रश्नांना आता पुन्हा नवी उभारी मिळाली आहे.