राज्यभरात सुरू असलेल्या कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप संपुष्टात आला असून कर्मचारी युनियन आणि परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत याप्रश्नी तोडगा निघाला आहे.
परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या आवाहनाला कर्मचारी युनियनने प्रतिसाद देत संप मागे घेण्याची घोषणा करत सोमवारपासून पुन्हा कामावर रुजू होण्याची शाश्वती दिली आहे.
परिवहन कर्मचारी युनियन आणि राज्य सरकार यांच्या झालेल्या बैठकीत सरकारकडून कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली. परिवहन कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात समितीची रचना करून युनियनच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारपासून सुरु असलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत होते. दरम्यान तीन दिवस सुरु असलेल्या या संपामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. रविवारी परिवहन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यात आले असून हा सोमवारपासून पूर्ववत बससेवा सुरु करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांनी दिले आहे.
यासंदर्भात कर्मचारी युनियन आणि सरकार यांच्यात बैठकही पार पडल्या होत्या. परंतु योग्य तोडगा न निघाल्याने हा संप सलग तीन दिवस सुरूच राहिला. रविवारी पुन्हा एकदा बैठक पार पडल्यानंतर अखेर याप्रश्नी तोडगा निघाला असून सोमवारपासून प्रवाशांना पुन्हा बससेवा उपलब्ध होणार आहे.