परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये सुरु असलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. विविध मागण्यांसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये आज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही सहभाग घेतला आहे. या आंदोलनाने एक नवे वळण घेतले असून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी डोक्यावर विटा ठेऊन आगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रविवारी हे आंदोलन असेच सुरु ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी सुरु झालेले हे आंदोलन रात्रंदिवस सुरूच आहे. बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकात सर्व बस उभ्या असून त्यांच्यासोबतच बसचे वाहक, चालक, परिवहन कर्मचारी आणि आता त्यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. बंगळूरमध्ये शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सामोपचाराने आणि चर्चेने हा विषय सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांना विनंती केली होती.
त्यासोबतच खाजगी वाहने सुरु करून जनतेची सोय करण्याचा इशाराही सवदींनी दिला होता. परंतु मागण्या मान्य जोवर होणार नाहीत, तोवर हे आंदोलन असेच सुरु ठेवण्याचा अट्टाहास कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही बेळगावमधील बससेवा ठप्प झाली आहे.
शनिवारी बेळगावमध्ये किल्ला तलवानजीक बसवर दगडफेकीचा प्रकार झाला होता. त्याचप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. याशिवाय बेळगावमध्ये एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यूही झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आपल्याला सर्व सोयी सुविधा आणि सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा अशा मागण्या परिवहन कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.
बेळगावमधील बससेवा ठप्प झाल्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. परिणामी परगावी प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खाजगी वाहनांची मदत घेण्यास सुरुवात केली असून महामार्गावर दिसणाऱ्या प्रत्येक वाहनाला अडवून आपले ठिकाण गाठण्यात प्रवासी वर्गाने धन्यता मनाली आहे. रविवारी कुटुंबियांसमवेत सुरु करण्यात आलेले हे आगळे आंदोलन कोणत्या टप्प्यावर येऊन ठेपेल? आणि सरकार यावर कोणत्या निर्णयाप्रती येऊन पोहोचेल? याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.