मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या एका युवकाचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास खादरवाडी येथे घडली.
विठ्ठल देवप्पा बस्तवाडकर (वय 21) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव आहे. विठ्ठल हा आज सकाळी आपल्या मित्रांसमवेत खादरवाडीच्या धरणात पोहण्यासाठी गेला होता. विठ्ठल धरणातील पाण्यात ट्यूब लावून पोहत होता. यावेळी पोहता -पोहता ट्यूब निसटल्याने विठ्ठल पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. युवक धरणात बुडाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच धरण काठावर बघ्यांची गर्दी झाली होती.
सदर घटनेची माहिती मिळतात बेळगाव ग्रामीण पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य हाती घेतले आहे. धरणात बुडालेला विठ्ठलचा मृतदेह सापडल्यानंतर शवचिकित्सा करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल.
विठ्ठल बस्तवाडकर हा अलीकडेच पोहण्यास शिकत होता. त्याच्या अकाली आकस्मिक अपघाती मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.
विठ्ठल हा घरात एकुलता एक मुलगा होता तो जी आय टी कॉलेजला इंजिनिअरिंग अंतिम वर्षात शिकत होता.