बेळगांवचे फडेप्पा (पवनंजय) दरेप्पा चौगुले हे क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील पहिले भारतीय ऑलम्पिक मॅरेथॉनपटू आहेत. मात्र या तत्कालिन महान क्रीडापटूची माहिती राज्य सरकारकडे नसल्याचा खेदजनक प्रकार नुकताच अधिवेशनादरम्यान निदर्शनास आला.
बेळगांवचे फडेप्पा (पवनंजय) दरेप्पा चौगुले हे इतिहासातील पहिले भारतीय ऑलम्पिक मॅरेथॉनपटू होते. अँटवर्प -बेल्जियम येथे 1920 साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे फडेप्पा मॅरेथॉन शर्यत 19 वे आले असले तरी पहिल्या 30 धावपटूंमध्ये तान मिळाल्याबद्दल त्यांना “डिप्लोमा ऑफ मेरिट” पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते.
अँटवर्प येथील 1920 च्या ऑलिंपिकमधील फेडप्पा चौगुले अर्थात पी. डी. चौगुले यांच्या मॅरेथॉन शर्यतीतील सहभागाची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्याकडे असली तरी इतक्या महान क्रीडापटूंची माहिती कर्नाटक सरकारकडे मात्र नाही.
बेळगांवच्या एका आमदारांनी पी. डी. चौगुले यांच्या कामगिरीची माहिती सरकारला आहे का? असा प्रश्न नुकताच अधिवेशनात उपस्थित केला. तसेच पी. डी. चौगुले यांनी ऑलम्पिक मध्ये बजावलेल्या कामगिरीला 100 वर्षे झाली आहेत. तेंव्हा सरकार हे शताब्दी वर्ष साजरे करणार का? अशी विचारणाही केली. तेंव्हा या संदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि कर्नाटक राज्य ऑलिम्पिक संघटनेकडून माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले.
पी. डी. चौगुले यांनी 22 ऑगस्ट 1920 रोजी अँटवर्प -बेल्जियम ऑलिंपिकमधील मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला होता आणि या शर्यतीत ते 19 वे आले होते. चौगुले यांच्यासाठी ही फक्त एक धावण्याची शर्यत असली तरी भारतीय क्रीडा इतिहासातमध्ये ही घटना एक मोठा मैलाचा दगड म्हणून नोंदविली गेली आहे. ही फक्त बेळगांवच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
शेरी गल्ली, बेळगांव येथे 1902 साली पी. डी. चौगुले यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्याकाळी चौगुले बेळगांव ते कोल्हापूर असा धावण्याचा सराव करायचे. इतक्या दीर्घ अंतराचा सराव ते अनवाणी पावलांनी करायचे हे विशेष होय. 1952 साली पी. डी. चौगुले यांचे निधन झाले. अँटवर्प येथील 10 हजार मीटर मॅरेथॉन शर्यतीत ते 2 तास 50 मिनिटे 5.4 सेकंद इतका वेळ देऊन 19 वे आले असले तरी पहिल्या 30 धावपटूंमध्ये ते अव्वल स्थानी असल्यामुळे त्यांना “डिप्लोमा ऑफ मेरिट” देऊन सन्मानित करण्यात आले होते.