शहरातील कपिलेश्वर पुलाखाली दिवसेंदिवस गैरप्रकारांना ऊत येत असून येथे होत असणाऱ्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पुलाखाली काही रेस्टोरंटस आणि बार असून याठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून तळीराम तळ ठोकून आहेत.
शिवाय रात्री अपरात्री याठिकाणी दारू पिऊन अनेक गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याभागात जवळच असलेल्या श्रीक्षेत्र दक्षिण कशी कपिलेश्वर मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी होते.
याशिवाय स्थानिक महिला आणि इतर नागरिक कामानिमित्ताने सकाळी लवकर बाहेर पडतात. तसेच कामावरून रात्री उशिरा येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कपिलेश्वर पुलाखाली दारुड्यांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली असून याठिकाणी असणाऱ्या बार आणि रेस्टोरंट चालकांना याआधीही समज देण्यात आली होती.
परंतु संबंधित बार आणि रेस्टोरंट चालकांकडून उद्धट उत्तरे देण्यात येत होती. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला असून आज सायंकाळी कपिलेश्वर रोड, रामा मेस्त्री अड्डा, महाद्वार रोड आणि कपिलेश्वर मंदिर परिसरातील नागरिकांच्यावतीने पुन्हा बार आणि रेस्टोरंट चालकांना समज देण्यात आली आहे.
तसेच या ठिकाणी होत असलेले गैरप्रकार थांबविण्यासाठी वेळेत दुकान बंद करण्यासाठीही सुचविण्यात आले आहे