काळी अमराई, कॉलेज रोड येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत साफसफाई करून नव्याने गटार बांधकाम न करता जुने गटार तसेच ठेवल्यामुळे गटारातील सांडपाणी इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचून दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारामुळे आसपासच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
काळी अमराई, कॉलेज रोड येथील राजू ओऊळकर यांच्या मालकीच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये उपरोक्त प्रकार घडला आहे. ओऊळकर यांच्या इमारतीच्या खालील भागात डीजेएसबी बँक असून वरच्या मजल्यावर स्वतः ओऊळकर राहतात. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या इमारतीसमोरील गटार आणि फूटपाथचे विकास काम करण्यात आले असल्याचे भासविले जात असले तरी प्रत्यक्षात याठिकाणी विकास कामाच्या नांवाखाली तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संबंधित अधिकारी व कंत्राटदाराकडून केला गेला आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत शहर -उपनगरातील जुन्या गटारीच्या जागी ज्या पद्धतीने नव्या गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे त्या पद्धतीने खरे तर ओऊळकर यांच्या इमारतीसमोरील मुख्य गटारीचे बांधकाम व्हावयास हवे होते. परंतु प्रत्यक्षात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने तेथील जुन्या गटारीची साधी सफाई देखील न करता त्या गटारीवर फुटपाथचे विकास काम सुरू केले आहे आहे. परिणामी जुन्या गटारीमधून सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न होता मोठ्या प्रमाणात गाळ साचून सांडपाणी तुंबले आहे. ओऊळकर यांची इमारत उतारावर असल्यामुळे हे सांडपाणी थेट त्यांच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये जमा होत आहे.
बेसमेंटमध्ये साचून राहिलेल्या या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. या दुर्गांधीबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आज पाचच्या नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात राजू ओऊळकर यांनी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड अनिल बेनके यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी आमदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ओऊळकर यांची समस्या तात्काळ सोडवावी, अशी सूचना केली होती. परंतु आजतागायत कोणतीच कार्यवाही झालेली नाही.
तेंव्हा आमदार बेनके यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कृपया गटार आणि सांडपाण्याच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्येचे युद्धपातळीवर निवारण करण्याची मागणी राजू ओऊळकर आणि परिसरातील नागरिक व व्यावसायिकांकडून केली जात आहे.