शहरातील भेंडी बाजार येथील प्रलंबित मास्टर प्लॅन अर्थात रस्ता रुंदीकरण मोहीम लवकरात लवकर राबविली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा भेंडी बाजार परिसर हा नेहमीच गजबजलेला असतो. मात्र अलीकडे काही वर्षापासून याठिकाणी रहदारीस अडचणी निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे.
परिणामी छोटे-मोठे अपघात होऊन या परिसरात वारंवार वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. अरुंद रस्त्यामुळे हे प्रकार घडत असल्याने या ठिकाणी लवकरात लवकर मास्टर प्लॅन अर्थात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
यापूर्वी बेळगांव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी पाहणी करून भेंडी बाजारमध्ये मास्टर प्लॅन राबविण्याची घोषणा केली होती. तथापि बरेच महिने उलटून गेले तरीही अद्यापही त्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे मध्यंतरी सर्व विकास कामे ठप्प झाली असली तरी आता भेंडी बाजारमध्ये रस्ता रुंदीकरण मोहीम राबविण्यास काहीच हरकत नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
तेंव्हा मनपा अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर भेंडी बाजार येथील प्रलंबित मास्टर प्लॅन मोहीम तात्काळ राबवावी, अशी मागणी होत आहे.