राज्यात गेल्या काही दिवसांपासून डोके वर काढलेल्या अंमली पदार्थ प्रकरणे हाताळण्यात आणि नियंत्रण मिळविण्यात सरकारला यश आले असल्याची माहिती गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
बेळगावमधील भाजप कार्यकारिणी बैठकीसाठी आलेल्या गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, मागील अनेक वर्षांपासून सुरु असलेली अंमली पदार्थाची जी प्रकरणे उघडकीस आली आहेत, त्यावर मागील १० महिन्यात सरकारने नियंत्रण मिळविलेले आहे.
अंमली पदार्थांची तस्करी, साठा आणि विक्री यावर लगाम लावण्यास पोलिसांच्या सहकार्याने सरकारला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळींवर विविध प्रकारे, विविध ठिकाणी छापा टाकण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पोलीस खात्याच्यावतीने कौतुकास्पद कामगिरी करत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ प्रकरणे उघडकीस आली आहेत. आणि या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे, आणि या कारवाईत ज्यांना पकडण्यात आले आहे, अशांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
यापुढील काळातही अशाचप्रकारे कारवाई करण्यासाठी सरकार आणि पोलीस खाते पुढाकार घेऊन प्रयत्नशील असेल, शिवाय अजूनही मोठ्या प्रमाणात याबाबत पाऊले उचलण्यात येतील, अशी गवाही, गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत गोहत्या कायदा आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून, येत्या अधिवेशनात यासंदर्भात ठराव मांडण्यात येणार आहेत. लव्ह जिहाद प्रतिबंधक कायदाही अस्तित्वात आणण्यासंबंधी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती बोम्मई यांनी दिली.