बेळगांव महापालिकेच्या महसूल विभागाने शहरातील होर्डिंग्ज हटविण्याची मोहीम हाती घेतली असून रविवारी सुट्टीच्या दिवशी बेळगांव उत्तर आणि दक्षिण भागातील होर्डिंग्ज तसेच फुटपाथवरील लहान जाहिरातींचे फलक हटविण्यात आले. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान राजकीय होर्डिंग्ज देखील काढून टाकण्यात आले.
शहरातील महापालिका व खाजगी मालकीच्या जागेतील मिळवून एकूण 180 होर्डिंग्जचा जाहिरात कर वसुलीचे कंत्राट नव्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील लिलाव प्रक्रिया लवकरच राबवली जाणार असून त्यासाठी प्रशासन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अनुमती दिली आहे. यासाठी शहरातील 180 होर्डिंग्ज स्ट्रक्चरवरील जाहिराती हटविण्याचा निर्णय झाला. आता जाहिरात कर वसुलीसाठी नवा कंत्राटदार निश्चित होईपर्यंत या 180 ठिकाणी जाहिराती लागणार नाहीत. दक्षिणेच्या तुलनेत शहराच्या उत्तर भागात जास्त होल्डिंग आहे. त्यामुळे रविवारी प्रामुख्याने उत्तर भागात मोहीम राबविण्यात आली.
शहराच्या दक्षिण व उत्तर भागातील फूटपाथ तसेच रस्त्यावर लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे रविवारी फुटपाथ व रस्त्यावरील जाहिरात फलक हटवून जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त के. एच. जगदीश व महसूल उपायुक्त एस. बी. दोडगौडर यांच्या आदेशावरून अतिक्रमण निर्मूलन पथकाने उपरोक्त कारवाई केली. महापालिकेला गेल्या शुक्रवारपासून तीन दिवस सुट्टी होती. परंतु तरीदेखील या सुट्टीच्या कालावधीत होर्डिंग्ज व जाहिरात फलक हटविण्याची कारवाई करण्यात आली.