दहावी बारावी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र चक्क ग्रामपंचायत निवडणुकीची मतपत्रिकाच लीक झाल्याचा अर्थात फुटल्याचा खळबळजनक प्रकार देसुर ग्रामपंचायतीमध्ये घडला आहे. या धक्कादायक प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून याला जबाबदार सर्वांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
बेळगांव जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका उद्या मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020 रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देसुर (जि. बेळगांव) ग्रामपंचायतीची मतपत्रिका आज आज निवडणुकीच्या एक दिवस आधी बाहेर फुटली असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत पोलिस बंदोबस्तात सुरक्षित ठेवल्या जातात. ही वस्तुस्थिती असताना देसुर ग्रामपंचायतीची निवडणूक पत्रिका लीक झाल्यामुळे अर्थात फुटल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. फुटलेल्या या मतपत्रिका गैरफायदा घेऊन उद्याच्या निवडणुकीत बोगस मतदान झाले तर त्याला कोण जबाबदार असा? संतप्त सवाल केला जात आहे.
मतपत्रिका फुटण्याच्या या प्रकाराचा जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून यासंदर्भात पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली असून तात्काळ पडताळणी करून संबंधित निवडणूक अधिकारी व अन्य जबाबदार लोकांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती जि. पं. सदस्य गोरल यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली. त्याचप्रमाणे तात्काळ कडक कारवाई न झाल्यास मतपत्रिकांचा झेरॉक्स प्रत काढून मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत देखील गोरल. यांनी व्यक्त केले निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतपत्रिका फुटण्याचा हा प्रकार सध्या चर्चेचा विषय झाला आहे.
या प्रकारामागे राजकीय हात असण्याची दाट शक्यता बोलून दाखवली जात आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असल्यामुळे जिल्हा प्रशासनासाठी हे एक मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.