पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बेळगाव तालुक्यात मंगळवारी रणधुमाळी रंगली. अत्यंत चुरशीने मतदान पार पडले असून गाव स्तरावरील राजकारणाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटल्याचे दिसून आले. परंतु अनेक मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळली असल्यामुळे आणि इतर ठिकाणच्या विभागामध्ये दुभाजली गेल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.
या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान केले. बेळगाव तालुक्यातील मराठीबहुल भाग असणार्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीने मतदान झाले. सायंकाळी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून आता उमेदवारांची नजर निकालाकडे लागली आहे.
तालुक्यात ठीकठिकाणी मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. दरम्यान समर्थकांनी मतदान केंद्रापासून ठराविक अंतरावर उभे राहून मतदारांना मार्गदर्शन सुरू केले. आज सकाळी हवामानात अत्यंत गारठा असूनही आशा थंडीच्या वातावरणात देखील उमेदवारांचे समर्थक केंद्रांच्या परिसरात उभे होते. दुपारच्या वेळी मतदानाचे बुथ रिकामे झाले होते. परंतु दुपारनंतर पुन्हा एकदा मतदारांचा उत्साह अधिकच वाढला आणि मतदानाची वेळ संपत आली त्यावेळी मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले.
अनेक ठिकाणी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याची रिक्षा आणि खाजगी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात होती.
त्यामुळे वयोवृद्ध मंडळीही मतदानासाठी सरसावली होती. तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीचा घोळ झाल्याचाही प्रकार निदर्शनास आला. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र मतदार यादी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी देखील ऐकावयास मिळाल्या आणि निवडणूक अधिकारी आणि उमेदवार यांच्यात वादावादीचेही प्रकार घडले.