आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील उमेदवारी अर्ज, माघारीचा अर्ज आदी आवश्यक सर्व कागदपत्रे मराठी भाषेमध्ये देखील उपलब्ध करावीत, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे. तसेच तशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगांव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
राज्य सरकारने येत्या 22 व 27 डिसेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या आहेत बेळगांव, खानापूर आणि चिकोडी तालुक्यात 50 टक्क्याहून अधिक मतदार मराठी भाषिक आहेत आणि त्यांना फक्त मराठी भाषा समजते. हे लक्षात घेऊन यापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीसह अन्य निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी या भागातील लोकांसाठी मराठी भाषेतील उमेदवारी अर्ज, उमेदवारी माघारीचा अर्ज, ॲफिडेव्हिट आणि अन्य आवश्यक कागदपत्रे कन्नड बरोबर मराठी भाषेत उपलब्ध करून दिली आहेत. आज 4 डिसेंबर असून 7 डिसेंबरपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.
त्यानंतर 11 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु दुर्दैवाने यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांकडून संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे कन्नड भाषेत उपलब्ध करण्यात आली आहेत, त्यामुळे मराठी भाषिकांची मोठी कुचंबना होत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन उमेदवारी अर्ज, उमेदवारी माघारीचा अर्ज, ॲफिडेव्हिट आदी ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे मराठी भाषेमध्ये देखिल उपलब्ध करावीत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या समवेत जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील ॲड. सुधीर चव्हाण श्याम पाटील, दत्ता उघाडे, आर. के. पाटील, एल. आय. पाटील,आर आय पाटील आदी उपस्थित होते.