संपूर्ण राज्यासह बेळगाव जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्याही पक्षाच्या आधाराशिवाय स्वतंत्र देण्यात आलेल्या चिन्हाचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहेत.
राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून आणि उमेदवारांकडून कायद्याचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे, याचा विचार करून या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चिन्ह आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा ध्वज वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, स्वतंत्र मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये खालील गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.
१) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या सभा, समारंभात कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह अथवा ध्वज अथवा बॅनर वापरण्यास मनाई आहे.
२) उमेदवाराने आपल्या पक्षालाच मतदान करावे, यासाठी मतदारांना कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये.
३) निवडणुकीत मतदारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या हॅंडबिल्स वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचे छायाचित्र, अथवा राजकीय पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई आहे.
४) प्रचारादरम्यान हॅण्डबील, कटआऊट, बॅनर, पताका यावर राजकीय नेत्यांचे छायाचित्र, राजकीय पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई आहे.
५) प्रचारादरम्यान टीव्ही माध्यमावर जाहिरात प्रसारित करताना राजकीय नेत्यांचे छायाचित्र, राजकीय पक्षाचे चिन्ह वापरण्यास मनाई आहे.
वरील दिलेल्या सूचना प्रत्येक उमेदवाराने पाळणे बंधनकारक असून या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या सामग्री जप्त करण्यात येतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच उमेदवारावर योग्य ती कारवाई करण्याचेही आदेशाच्या परिपत्रकात म्हटले आहे. सोमवार दि. १४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.