कॅम्प येथील बी. के. मोडेल हायस्कूल येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे काउंटिंग अर्थात मतमोजणी जोराने सुरू आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मात्र कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूची बासनात गुंडाळून ठेवल्याचे चित्र आज सकाळी पहावयास मिळाले.
बेळगांव तालुक्यातील 55 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी बी. के. मॉडेल हायस्कुल येथील केंद्रात सुरू आहे. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या निर्बंधित क्षेत्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शेकडोंनी गर्दी केली आहे. या सर्वांकडून सामाजिक अंतराच्या नियम पायदळी तुडविला जात असून हीच परिस्थिती मास्कच्या बाबतीत आहे. बहुतांश उमेदवार आणि समर्थक जणू कोरोनाला आव्हान देत असल्याप्रमाणे मास्क न घालता वावरताना दिसत होते.
नव्या विषाणूमुळे कोरोनाचा धोका वाढलेला असताना या पद्धतीने कोरणा संदर्भातील नियमांचे खुलेआम उल्लंघन केले जात होते. त्याचप्रमाणे आपले कांही देणे-घेणे नसलेल्या प्रमाणे पोलिस आणि संबंधित अधिकारी देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करताना असल्यामुळे जागरूक नागरिकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.