ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीच्या व्याप्तीत २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून पासून ते २२ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत तसेच दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी २५ डिसेंबर सायंकाळी ५ ते २७ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मद्यविक्रीस निर्बंध घालण्यात आले असून यासह १४४ कलम लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत ५१३ गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यात आली असून आरोपही दाखल करण्यात आले आहेत.
निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी तसेच निवडणूक काळात अनुचित प्रकारांवर रोख लावण्यासाठी २८ चेकपोस्टची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.
बेळगाव तालुका वगळता बेळगाव जिल्हा पोलीस व्याप्तीत येणाऱ्या १३ तालुक्यात योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी १ एसपी, १ वरिष्ठ पोलीस अधिकारी, ७ डीएसपी, १३ सीपीआय, ६४ पीएसआय, १३२ एएसआय, २७१० एचसी आणि ५५५ पीसी होमगार्ड कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच १८ जिल्हा सशस्त्र दल आणि ६ राज्य पोलीस दलांना तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात होऊ घातलेल्या दोन टप्प्यातील निवडणुकीसाठी ७५ विभागांसाठी एकूण १५० विभाग अधिकाऱ्यांचे पथक स्थापण्यात आले असून संपूर्ण तालुक्यात हे अधिकारी सेवा बजाविणार आहेत.
प्रत्येक तालुक्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेव्यात येणार असून ७ डीएसपी दर्जाच्या अधिकारीही निवडणूक काळात बंदोबस्तासाठी हजर राहणार आहेत. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये, हि निवडणूक सुरळीतपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन पुढारले आहे, अशी माहिती लक्ष्मण निंबरगी यांनी दिली.