ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा मंगळवार दि. २२ डिसेंबर रोजी पार पडला असून २७ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. मंगळवारी झालेल्या मतप्रक्रियेतील मतपेट्या शहरातील बी. के. मॉडेल हायस्कुल मधील स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या असून ३० डिसेंबर रोजी बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
याठिकाणी सशस्त्र पोलीसांचा पहारा ठेवण्यात आला असून उर्वरित ग्रामपंचायतिच्या मतमोजणीचे काम संबंधित तालुक्यातील ठिकाणी होणार आहे. मंगळवारी बेळगावसह, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक आणि मुडलगी तालुक्यातील २५९ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
बेळगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या ९६४ जागांसाठी तीन हजार पाच उमेदवारांचे भवितव्य या मतपेटीत बंद झाले आहे. बी. के. मॉडेल शाळेत मतमोजणीसाठी प्रशासनाने आवश्यक तयारी सुरु केली असून मतमोजणीसाठी अजून सहा दिवसांचा कालावधी आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे काम संथगतीने सुरु आहे. ३० डिसेंबर रोजी सकाळी अथपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर झाल्याने मतमोजणीला उशीर होण्याची शक्यता आहे. सायंकाळी उशिरा अंतिम निकाल जाहीर होण्याचीही शक्यता आहे.