राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार आता मावळला असून पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी २२ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकाभागात करणीबाधेला ऊत आला असून ठिकठिकाणी लिंबू, नारळ, गुलाल, काळी बाहुली यासारख्या वस्तू आढळून येत आहेत. अनेक ठिकाणी उमेदवाराच्या घरासमोरच अशा वस्तू टाकण्यात आल्या असून संपूर्ण तालुक्यात हा विषय चर्चेचा ठरत आहे.
हिंडलगा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असे प्रकार घडून आले आहेत. त्याचप्रमाणे गौंडवाड भागात देखील मोठ्या प्रमाणात हा प्रकार झाल्याचे आढळून आले आहे. अशा पद्धतीच्या अनेक वस्तू उमेदवारांच्या घरासमोर टाकलेल्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात हा कुतूहलाचा विषय बनत चालला आहे.
जग वेगाने विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. पुरोगामी विचारांच्या वाटेने सध्या संपूर्ण जग पुढे चालले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या संघटना कार्यरत आहेत. परंतु अजूनही कित्येक लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून आणि जखडून पडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकाराला नेहमीच ऊत येतो. २०२० सालच्या युगातही असे प्रकार पाहणे हा कुतूहलाचा विषय ठरत आहे.