सोशल साईट्सवर खोट्या बातम्यांचा मोठ्याप्रमाणात सुळसुळाट सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी ‘फॅक्ट चेक’ या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकारांनी घटनास्थळी स्वतः पोहोचून घटनेची पडताळणी करून त्यानंतर बातम्या प्रसारित कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रासारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
सोमवार दि. १४ डिसेंबर रोजी या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोशल साईटवर अनेक बातम्या अत्यंत कमी वेळेत व्हायरल होत आहेत. यापैकी कित्येक बातम्या या खोट्या असतात. यामुळे जनतेपर्यंत चुकीच्या बातम्या पसरून काहीवेळा चिंतेचे वातावरण निर्माण होते. त्यासाठी पत्रकारांनी कोणत्याही घटनेचा तापाशील पडताळून पाहूनच बातम्या प्रसारित करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
खोट्या बातम्यांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. अनेक वेळा जनता घाबरून आणि गोंधळून जाते. जनतेपर्यंत अशापद्धतीच्या बातम्या पोहोचविणाऱ्यांवर शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या शिबिरात स्पष्ट केले. यावेळी सोशल साईटच्या माध्यमातून जनतेत अनेकवेळा निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेची त्यांनी उदाहरणेही दिली.
या शिबिरात माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर बोलताना म्हणाले, सोशल साईट्सवर खोट्या बातम्यांचा सुरु असलेला धुमाकूळ आणि यामुळे जनतेमध्ये निर्माण होत असलेला संभ्रम या गोष्टी टाळण्यासाठी, या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात ‘फॅक्ट चेक’ या विषयावर मार्गदर्शन आणि सल्ला देण्यासाठी पत्रकार आणि गुगल संस्थेचे प्रमोद हरिकांत यांना आमंत्रित करण्यात आले होते. या शिबिरात सोशल साईटवर होणाऱ्या चुकांविषयी, तसेच सोशल साईटवर कोणत्या पद्धतीने बातम्या प्रसारित कराव्यात, बातमीची पडताळणी कशी करावी, यासंदर्भात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. अनेकवेळा जुनी छायाचित्रे, व्हिडीओ, ध्वनिफीत प्रसारित करून जनतेमध्ये अफवा पसरविण्याचे कार्य अनेक सोशल साइट्सच्या माध्यमातून केले जाते. अशा अनेक घटनांचे प्रात्यक्षिक स्वरूपातील उदाहरण त्यांनी पत्रकारांना दिले.
या शिबिरात फोटो व्हेरिफिकेशन, व्हिडीओ व्हेरिफिकेशन, वेबनाईट व्हेरिफिकेशन, जिओ लोकेशन आणि सोशल साईटवर प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची पडताळणी यासह अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते.